ग्रामपंचायत कर्मचारी २८ एप्रिलला जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार

देवरुख:- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन शासनाकडून जाहीर झालेले असतानाही ग्रामपंचायत स्तरावरून त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ दि. २८ रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कृष्णा होडे यांनी दिली आहे.

या बाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे. यामध्ये राज्य शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन देण्याचे जाहीर केले. असे असतानाही थकीत वेतन व राहणीमान भत्ता अजून पर्यंत देण्यात आलेला नाही. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या विविध सेवा सवलती यांची रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून अंमलबजावणी होत नाही.

ग्रामपंचायत कर्मचारी सेवा सवलतींच्या लाभांपासून वंचित आहेत. यामुळे ग्रामपंचायत स्तरावर शासन निर्णयाची पायमल्ली होत असल्याचेही संघटनेने नमूद केले. कर्मचान्यांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे, निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी व अर्जित रजेचा लाभ मिळावा. सेवानिवृत्त अथवा मयत होणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ग्रामपंचायत सेवेत सामावून घेण्यात यावे, यांसह अनेक मागण्यांसाठी कर्मचारी संघ लढत असून, या मागण्यांची पूर्तता व्हावी अशी मागणी पुन्हा एकदा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शासनाने आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास दि. २८ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेसमोर सर्व ग्रामपंचायत कर्मचारी धरणे आंदोलन छेडणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण पांचाळ व श्री. होडे यांनी स्पष्ट केले आहे.