ग्रामदैवतांचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने

दरवर्षी गजबजणाऱ्या मंदिरांमध्ये यावर्षी मात्र शांतता

रत्नागिरी:- कोकणातल्या ग्रामदैवतांच्या मंदिरातील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व असतं. यावर्षी नवरात्रोत्सवावर कोरोनाचं सावट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे दरवर्षी या सणाला गजबजणाऱ्या मंदिरांमध्ये यावर्षी मात्र शांतता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच ग्रामदैवतांच्या मंदिरांमध्ये हीच स्थिती आहे.  

कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं प्रतीरुप समजल्या जाणा-या रत्नागिरीतील काजरघाटी मंदिरात देखील नवरात्रोत्सव अतिषय साध्या पद्धतीनं  साजरा केला जात आहे. श्री महालक्ष्मी, महाकाली आणि व्याघ्य्रांबरी या तीन देवींचं इंथ मंदिर आहे. काजरघाटीची ही ग्रामदैवता आहे. निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. 300 वर्षापासूनची या मंदिरातील उत्सवाची परंपरा अद्यापही अखंडीत आहे.  श्री महालक्ष्मीच्या  मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटींचं पालन करून धार्मिक विधी केल्या जात आहेत. मात्र दरवर्षी गजबजलेल्या  या मंदिरात यावर्षी मात्र आता शांतता पहायला मिळत आहे.