रत्नागिरी:- गोवा राज्यात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा आरोपी ३० दिवसांच्या पॅरोलवर रत्नागिरीत आला. रजा संपल्यानंतर कारागृहात परत न गेल्यामुळे येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॅरोल रजेवर आल्यानंतर परत न जाण्याची ही रत्नागिरीतील दुसरी घटना आहे. शहरातील मिरकरवाडा येथे तो राहत होता.
चन्नाप्पा सरन्नाप्पा गंगवार (३३, मुळ रा. विजापूर, कर्नाटक) असे या रोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात गोवा राज्यातील मडगाव शहर पोलिस ठाण्यात २६ सप्टेंबर २०१९ ला खूनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला मडगाव अतिरीक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून तो दक्षिण गोव्यातील बारदेश तालुक्यातील कोलवले येथील कारागृहात होता. ११ जुलै २०२४ ते ९ ऑगस्ट २०२४ अशी एकूण ३० दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. या कालवधीत तो रत्नागिरीच्या मिरकरवाडा येथे मस्तान मोहल्ल्यात एका व्यक्तीकडे राहाणार होता. ३० दिवसांनी रजा भोगून ९ ऑगस्ट २०२४ ला सायंकाळी सहा वाजेपर्यत त्याने स्वतःहून कोलावले कारागृहात हजर होणे आवश्यक होते. परंतु तो अद्याप हजर झालेला नाही. त्यामुळे कोलावले कारागृहातून रत्नागिरी पोलिस अधिक्षकांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले होते. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस फौजदार पालांडे अधिक तपास करत आहेत.









