गोवंश हत्त्येतील आरोपीला दुसऱ्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन

रत्नागिरी:- गोवंश हत्त्या प्रकरणातील आरोपी शादाब बलबले याला बेकायदेशीररित्या गुरे बाळगल्याप्रकरणी गुन्ह्यात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गोवंशाची कापलेली मान मिळाल्याप्रकरणी पहिल्या गुन्ह्यात त्याला अटक झाली . परंतु तो जामीनावर मुक्त झाला होता . ग्रामीण पोलिस त्याला बेकायदेशीररित्या वेतोशी येथे गुरे बाळगल्याप्रकरणात अटक करण्याच्या प्रयत्नात होते . रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील रेल्वे कॉलनीजवळच्या रस्त्यावर गोवंशची कापलेली मान मिळाली होती . याप्रकरणी शादाब बलबले ( वय ३० , रा . क्रांतीनगर ) याला अटक करण्यात आली होती . वेतोशी येथे त्याने प्राणी संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करून गुरे बाळगली असल्याचे पोलिसांना आढळून आल्याने त्याच्यावर याप्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाला होता . या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा , यासाठी न्यायालयात धाव घेतली होती . शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला २५ हजार रुपये जातमुचलक्याचा जामीन मंजूर केला . रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात हजेरी लावण्याची अटही न्यायालयाने घातली आहे . गोवंशची मान मिळाल्यानंतर आरोपीला अटक व्हावी , यासाठी हिंदू बांधवांकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते . याचा परिणाम म्हणून शादाब बलबले या आरोपीला अटक करण्यात आली . पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या तपासात सहकार्य केले नाही . त्याचबरोबर हा गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने त्याला जामीन न देता न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली होती . यासंदर्भात पोलिसांकडून लेखी म्हणणे सादर न झाल्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला . हा जामीन रद्द व्हावा , यासाठी जिल्हा न्यायालयात अपील करण्याबाबतची पोलिसांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.