गोळीबार करणाऱ्याच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

चिपळूण:- शहरातील गोवळकोट रोड येथे भर दिवसा बंदुकीची गोळी थेट हायलाईफ या इमारतीतील सदनिकेच्या खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली होती. या घटनेनंतर नेमकी गोळी कोणी झाडली, शिवाय ती बंदूक कोणाची याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दरम्यान, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोवाळकोट रोड येथे हायलाईफ ही तीन मजली इमारत आहे. त्यामध्ये पहिल्या मजल्यावर असलेल्या अशरफ तांबे यांच्या सदनिकेच्या स्वयंपाक घरात रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बंदुकीची एक गोळी थेट खिडकीची काच फोडून घुसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. -शहरातील गोळकोट रोड येथील इमारती लगतच शेती परिसर असून त्याठिकाणी शिकारीच्या उद्देशाने अज्ञाताने ही गोळी प्रकरण झाडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असला तरी ती गोळी नेमकी कोणी झाडली, शिवाय ती बंदूक कोणाची याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. यासाठी गोवळकोट रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.