रत्नागिरी:- अपारंपरिक ऊर्जा संसाधनांसाठी जिल्हा नियोजनमधील राखीव निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गोळपपाठोपाठ गुहागर तालुक्यात जिल्ह्यातील दुसरा 1 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी वरवेली येथील जागेचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी आठ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. वरवेली आणि गोळप येथील सौर प्रकल्प कार्यन्वित झाले तर पथदिपामुळे येणाऱ्या विजबिलात 40 टक्के बचत होणार आहे.
गुहागर वरवली येथे होणारा जिल्ह्यातील हा दुसरा प्रकल्प आहे. सुमारे नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच तांत्रिक मंजूरीसाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी महावितरण आणि जिल्हापरिषद कृषी विभागाच्या अधिकार्यांची काही दिवसांपुर्वी चर्चाही झाली. सौर प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी वीज महावितरणला दिली जाते. त्यासाठी तिथे डीपी उभारावा लागतो. वरवली येथे सोयीस्कर जागा शोधण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पहिला प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे होत असून त्याचे काम नुकतेच सुरु झाले आहे. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यामधून विजनिर्मिती केली होईल अशी अपेक्षा अधिकार्यांकडून व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील सर्व पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) महिन्याचे वीजबिल 60 लाख रुपये येते. वर्षाचे विजबिल सव्वासात कोटीवर जाते. अनेकवेळा विलबिलांसाठी निधी न मिळाल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे स्थानिक जनतेची गैरसोय होते. पथदीप आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची विजबिले भरण्यासाठी जिल्हा परिषदेचा सादिल निधीही तुटपुंजा पडतो. त्याला पर्याय म्हणून 1 मेगावॅट क्षमतेचे सौरप्रकल्प ठिकठिकाणी उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्याकडून गुहागर तालुक्यातील वरवेली येथील प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पांसाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष पाठबळ असून तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी राज्यस्तरावरही अधिकार्यांच्या बैठका घेत आहेत. पुढील वर्षी या ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प होणे अपेक्षित आहे.









