गोळप-धोपटवाडीत आंबे काढताना झाडावरून पडून कामगार जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील गोळप-धोपटवाडी येथे हापूस आंबा कलमाचे आंबे काढत असताना नेपाळी झाडावरुन पडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी पावस येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सागर रामबहाद्दूर रसायली (वय ३४, रा. धोपटवाडी-गोळप, मुळ ः नेपाळ ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २५) सकाळी नऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर रसायली हा गजानन तेंडुलकर (रा. हर्चे, ता. लांजा) यांनी अरविंद गंगाराम मांडवकर यांना कराराने दिलेल्या उभावाडा येथील हापूस आंबा बागेत आंबे काढत होता. झाडावर चढून आंबे काढत असताना त्याच्या हातातील व पायाखालील दोन्ही झाडाच्या फांद्या तुटल्याने तो पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने तात्काळ त्याला पावस येथे दाखल केले होते अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपाचार सुरु आहे. या प्रकरणी रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.