रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप धार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला न्यायालयाने २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सय्यद अन्सार पाशा (५०, रा. चित्रदुर्ग कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. आर. पाटील यांनी या खटल्याचा निकाल दिला.
खटल्यातील माहितीनुसार, सय्यद पाशा हा २१ ऑगस्ट २०२५ रोजी ट्रक (केए १६ एए १४११) घेवून रत्नागिरी-पावस रस्त्याने जात होता. रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाशा हा गोळप धार येथे आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. यावेळी ट्रक रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडाला धडकला. या अपघातात पाशा याला दुखापत झाली होती तसेच ट्रकचेही नुकसान झाले होते. या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी पाशाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१,१२५ (अ) व मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.









