जहाजावरील हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट असण्याची शक्यता
गुहागर:- तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी रविवारी (ता. ३) सकाळी बॉम्बसदृश स्फोटके आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. आढळून आलेली पाचही स्फोटके बॉम्बशोधक पथकाने निकामी केली.
ही स्फोटके मुलांच्या हाती लागली असती, तर त्याचा स्फोट होऊन दुर्घटना घडली असती, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. माजी सरपंच नवनीत ठाकूर यानी समुद्रातील प्लास्टिक बरणी बाहेर काढली नसती, तर ही स्फोटके आहेत, याचा पत्ताही लागला नसता.
वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नवनीत ठाकूर हे नेहमीप्रमाणे आपल्या घराशेजारील समुद्रकिनारी चालण्यासाठी गेले होते. चालत असताना त्यांना समुद्रात लाटेवर मोठी प्लास्टिक बरणी तरंगत येताना दिसली. ठाकूर यांनी पाण्यात जाऊन प्लास्टिक बरणी पाण्यातून बाहेर काढली. आत पाहिले असता, त्यात स्फोटकांसारख्या वस्तू दिसून आल्याने त्यांनी पत्नी व जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांना सदर प्रकार सांगितला. ठाकूर यांनी गुहागर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती दिली.
पोलिस निरीक्षक बी. के. जाधव हे उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विशाल वायगंणकर, वैभव चौगुले,कुमार घोसाळकर, आशिष फुटक यांना घेऊन सकाळी ८ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या बॉम्बसदृश वस्तूची पाहणी करून लगेचच वरिष्ठांना त्याची माहिती दिली. वरिष्ठांनी तत्काळ याची दखल घेत रत्नागिरीतून बॉम्बशोधक प्रमुख प्रीतेश शिंदे आणि सहकाऱ्यांसह श्वानही पथक पाठविले. या पथकाने स्फोटकांची तपासणी केली. ही स्फोटके नवनीत ठाकूर यांच्या मोकळ्या जागेमध्ये नेली व तेथे पाचही स्फोटके निकामी करण्यात आली.
दरम्यान, ही स्फोटके कशासाठी वापरली जात होती, याबाबत या पथकाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही; मात्र ती मुलांच्या हाती लागली असती तर अपघात घडला असता, असे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्फोटके निकामी करतेवेळी सरपंच चैतन्य धोपावकर, माजी सरपंच नवनीत ठाकूर, प्रतीक ठाकूर हेही उपस्थित होते. नवनीत ठाकूर यांनी किनाऱ्यावर संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर दाखवलेल्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









