गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर गावातील कॉलरा साथीवर नियंत्रण

 आरोग्य विभागाचा दावा; एकूण 65 रुग्ण सापडले

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार पाचेरी आगर गावातील भुवडवाडी, हुमणेवाडी व गुरववाडी येथे आलेल्या कॉलरा साथीवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळवले आहे. 23 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 65 रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूकर यांनी दिली.

पाचेरी आगार येथे पहिल्या दिवशी कॉलराचे 36 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आरोग्य विभागाने तिन वैद्यकीय अधिकार्‍यांसह आठ जणांचे पथक पाठवण्यात आले. या पथकाने साथग्रस्त भागात नियमित सर्वेक्षण सुरु केले. त्यामुळे साथ आटोक्यात आणण्यात यश आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि सूचना दिल्या. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणी पुरवठा साधनांची पहाणी करून, नळ पाणी योजनेच्या पाईप लाईनच्या लिकेज संदर्भात पाहाणी केली. मागील दोन दिवसांत एकही कॉलराचा रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी क्लोरीनयुक्त पाणी प्यावे आणि इतर ठिकाणचे पाणी पिण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. तिन्ही वाड्यांना पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीत टाकलेल्या क्लोरीनचा साठाही बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अतिसाराची साथ आटोक्यात आणली गेली.