गुहागरात घरफोड्यांचे सत्र; दोन दिवसात 6 ठिकाणी घरफोड्या

गुहागर:-गुहागरमध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दोन रात्रीमध्ये 6 ठिकाणी चोऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 मंदिरातील दानपेट्या तर एका ठिकाणी गॅरेज आणि घर फोडी अशा एकूण 6 ठिकाणी चोरी झाली आहे.  

 आरे येथील श्रीराम मंदिर, श्री दत्त मंदिर वेरवली, मराठवाडी येथील श्री हसलाई देवी मंदिर व पालशेत येथील श्री गणेश मंदिर अशा चार ठिकाणी चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या. सर्व मंदिरातील गाभाऱ्यांचे टाळे फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये हसालाई मंदिरात असेलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरटे नीटसे दिसत नाहीत. 

या घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार 11 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी पुन्हा गुहागरातील शृंगारतळी वेळंब येथे मंगेश प्रभाकर जाधव यांचे गॅरेज फोडले. याबाबत मंगेश यांनी गुहागर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. ते रक्षाबंधनसाठी मुंबई येथे गेले होते. त्यांचे वेळंब येथे भाड्याच्या खोलीत राहतात. खोलीच्या बाजूला दुसऱ्या रूम मध्ये त्यांचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेज मध्ये काम करणारे सूर्यकांत नवलकर हे गुरुवारी सायंकाळी गॅरेज बंद करून घरी गेले होते. मंगेश जाधव हे 12 ऑगस्ट रोजी मुंबईहुन शृंगारतली येथे आले असता त्यांना आपल्या खोलीचा दरवाजा कडी – कोयंडा उचकटलेला दिसला. आत जाऊन पाहिले तर घरातील सिलेंडर तसेच ब्लू टूथ स्पीकर चोरीस गेला होता. त्यांनी गॅरेज मध्ये जाऊन पाहिले असता. तिथेही खोलीचे कडी कोयंडा उचकटून गाडीच्या दोन बॅटऱ्या चोरीस गेल्याचे दिसून आले. एकूण 9500 रुपयांच्या मालाची चोरी झाली आहे. जाधव यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.