गुहागरमध्ये घरकुल योजनेच्या वादातून वृद्धाला मारहाण

गुहागर:- घरकुल योजनेच्या वादातून गुहागर तालुक्यातील हेदवी-हेदवतड मोरेवाडी येथे एका ५५ वर्षीय व्यक्तीला मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे दोन्ही हात आणि एक पाय मोडला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेली घटना अशी की, फिर्यादी एकनाथ गोविंद मोरे (वय ५५) हे आपल्या घराबाहेर असताना त्यांचे चुलत भाऊ आणि भावजय असलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने आरोपींच्या घरकुल योजनेला विरोध करणार असल्याचे बोलले, याच रागातून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एकनाथ मोरे घरी एकटे असताना, आरोपी रामचंद्र महादेव मोरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका महिलेने त्यांना घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. ‘तुला ठार मारून टाकतो,’ अशी धमकी देत लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, पाठीवर, छातीवर, दोन्ही हातांवर आणि पायांवर जबर मारहाण केली. या हल्ल्यात एकनाथ मोरे यांचे दोन्ही हातांची हाडे आणि डाव्या पायाचे हाड मोडले. तसेच, त्यांच्या उजव्या पायाला आणि डोळ्याच्या भुवईवरही गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर, जखमी एकनाथ मोरे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११८(२), ३५२, आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गुहागर पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घरगुती वादातून झालेल्या या गंभीर गुन्ह्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.