गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चौघांना अटक

९ लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरूख:- देवरूख पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत, कोल्हापूरहून रत्नागिरीकडे गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहन जप्त केले असून, चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी रात्री २.३० च्या सुमारास देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे आपल्या सहकाऱ्यांसह दाभोळे येथे गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद गाडी उभी दिसली. पोलिसांनी गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करताच, चालकाने गाडी वेगाने पळवून नेली.
पोलिसांनी तात्काळ त्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि हातखंबा ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. हातखंबा येथे देवरूख आणि ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकाने गाडी अडवून ती ताब्यात घेतली. गाडीची तपासणी केली असता, त्यात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी नेला जात असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी गाडीतील चौघांना ताब्यात घेतले असून, गुटखा आणि गाडीसह एकूण ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून, रात्रीची गस्त वाढवली आहे. देवरूख पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.