गुगल पे द्वारे स्वतःच्या खात्यात ६० हजार घेत मिरकरवाडा येथे एकाची फसवणूक

रत्नागिरी:- गुगल पे व्दारे आपल्या खात्यात ६० हजार रुपये ट्रान्स्फर करत फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर फसवणुकीची घटना मंगळवार १८ जुलै रोजी दुपारी २.१५ ते बुधवार १९ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. कालावधीत मिरकरवाडा येथे घडली आहे.

हाफिस असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हे कांचन ओशन व्ह्यु अपार्टमेंट मिरकरवाडा येथे राहतात. मंगळवारी फिर्यादी घरीच असताना संशयित हाफिसने फिर्यादीच्या मोबाईलवरुन गुगल पे व्दारे आपल्या खात्यात ५९ हजार ९०० रुपये ट्रान्स्फर केले. ही बाब फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी संशयिताला फोन करुन पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा संशयिताने २४ तासांत तुमच्या खात्यात पैसे जमा करतो असे सांगितले.

परंतु २४ तास उलटून गेल्यानंतरही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांनी शनिवार २२ जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी हाफिस विरोधात भादंवि कायदा कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.