Wednesday, August 19, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गिम्हवणे येथे ९ लाख ६० हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा

गिम्हवणे येथे ९ लाख ६० हजारांचा अपहार; दोघांवर गुन्हा

दागिने गहाण ठेवत बचत गटाच्या रकमेची हेराफेरी

दापोली:- दापोली तालुक्यातील गिम्हवणे सुतारवाडी येथे विश्वासाचा गैरवापर करून सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवणे आणि महिला बचत गटाच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल पासून ते १७ ऑगस्ट या कालावधीत गिम्हवणे सुतारवाडी, ता. दापोली येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी १७ ऑगस्ट रोजी रात्री ९:१६ वाजता राजापूर पोलीस ठाण्याशी संबंधित दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सौ. पूर्वा गणेश देवघरकर (वय ३८ वर्षे, व्यवसाय: गृहिणी, रा. गिम्हवणे सुतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन प्रतिज्ञा विश्वास देवघरकर (वय ३१ वर्षे), विश्वास रमेश देवघरकर (वय ३८ वर्षे, दोन्ही रा. गिम्हवणे सुतारवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रतिज्ञा विश्वास देवघरकर, विश्वास रमेश देवघरकर यांनी फिर्यादीकडून १६ मे २०२६ रोजी परिधान करण्यासाठी विश्वासाने नेलेले फिर्यादीच्या मालकीचे सुमारे ६ तोळे वजनाचे मंगळसूत्र परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यातून मिळणारे पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तसेच फिर्यादीच्या भावकीतील अनुष्का उमेश देवघरकर यांच्या मालकीची सुमारे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले २३ एप्रिल २०२६ रोजी आरोपी क्रमांक ०१ हिने परिधान करण्यासाठी नेऊन तीही परस्पर बँकेत गहाण ठेवून पैशांचा अपहार केला.
​याशिवाय, प्रतिज्ञा विश्वास देवघरकर ही ‘विश्वकर्मा समूह महिला मंडळ बचत गटाची’ सचिव पदावर कार्यरत होती. बचत गटातील महिलांच्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी भरण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. मात्र, तिने फिर्यादीसह बचत गटातील १२ महिलांकडून हप्त्याची सुमारे ४,६०,०००/- रुपये रक्कम गोळा करून ती बँकेत न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. तसेच एच.डी.एफ.सी. बँकेमधून महिला बचत गटाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या १०,००,०००/- रुपये कर्जापैकी परतफेडीसाठी महिलांनी तिच्याकडे विश्वासाने जमा केलेले सुमारे ५,००,०००/- रुपये देखील बँकेत न भरता अपहार केला. ​अशा प्रकारे एकूण ९,६०,०००/- रुपयांची फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.