जिल्ह्यात पुन्हा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
रत्नागिरी:- ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून जिल्ह्यात ’संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात प्रथम येणार्या गावास सहा लाख, तर राज्यस्तरीय प्रथम येणार्या ग्रामपंचायतीस 50 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. त्यामुळे गाव स्वच्छ ठेवा अन लाखो रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत.
ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येत आहेत. ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून ’संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता’ अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून गेल्या आठवड्यापासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. येत्या 30 जानेवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकण्याच्या अनुषंगाने ’स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2’ अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अशा प्रकारच्या सर्व कामांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणार्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांना अभियानांतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
हे आहेत पुरस्कार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत पुरस्कार प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रथम क्रमांक ग्रामपंचायतीस 60 हजार, जिल्हा स्तरावरील प्रथम क्रमांकास सहा लाख, द्वितीय क्रमांकास चार लाख व तृतीय क्रमांकास तीन लाख, विभागस्तरीय प्रथम क्रमांकास 12 लाख, द्वितीय क्रमांकास नऊ लाख व तृतीय क्रमांकास सात लाख व राज्यस्तरीय प्रथम क्रमांकास 50 लाख, द्वितीय क्रमांकास 35 लाख, तृतीय क्रमांकास 30 लाख रक्कम मिळणार आहे.