गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता

राजापूर:- गावठी बॉम्ब फुटून बैल जखमी झाल्याच्या प्रकरणातून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याची सुनावणी न्यायालयात होऊन संशयित आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

डुक्कर किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटल्याची घटना ६ जानेवारी रोजी तालुक्यातील निवेली येथे घडली होती. यामध्ये निवेली येथील प्रकाश घाणेकर यांचा बैल जखमी झाला होता . याप्रकरणी प्रकाश घाणेकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अणसुरे येथील संशयीत आरोपी कृष्णा उर्फ नाना विष्णू कणेरी ( ४७ ) व अमोल बाळकृष्ण नाचणेकर ( ३७ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती . 

याप्रकरणी  न्यायालयात १६ जानेवारी रोजी सुनावणी झाली. दोन संशयीत आरोपींची रत्नागिरी न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे.