रत्नागिरी:- तालुक्यातील उक्षी येथे कत्तलीच्या उद्देशाने गायी आणून त्याना क्रूर वागणूक दिल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जुनेद दिलावर खान (३०, रा. उक्षी मुस्लीमवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
गुन्ह्यातील उक्षी मुस्लीमवाडी येथे कत्तल करण्यासाठी गुरे आणली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ३० जून २०२० रोजी ग्रामीण पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. यावेळी जुनेद खान याच्या घराच्या पाठीमागील जागेमध्ये दोन गायी यातना होईल अशा प्रकारे झाडाला बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी जुनेदसह चौघांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सरकार पक्षाकडून न्यायालयापुढे ६ साक्षीदार तपासण्यात आले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने जुनेद खान याची निर्दोष मुक्तता केली. आरोपिच्यावतीने अॅड. सुहेल शेख यांनी काम पाहिले.









