रत्नागिरी:- गाडीचे कर्ज फेडण्याकरता घेतलेली सुमारे 7 लाख रुपयांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 जानेवारी 2020 ते 27 जुलै 2020 या कालावधीत घडली आहे.
संतोष विश्वनाथ जगदाळे (मुळ रा.सासवड,पूणे सध्या रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात प्रियंका विजय साळवी (65,रा. शिवतीर्थ अपार्टमेंट तेली आळी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे रविवार 26 सप्टेंबर 2021 रोजी तक्रार दिली आहे. त्यानूसार,संतोष जगदाळे आणि प्रियंका साळवी कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत. याचा फायदा उठवत संतोषने आपल्या गाडीचे कर्ज फेडण्याकरता त्यांच्याकडे पैसे मागितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून प्रियंका साळवी यांनी पतीच्या युनियन बँकेच्या खात्यातून चेकव्दारे संतोषला 7 लाख रुपये दिले होते.
परंतू,या घटनेला वर्षाचा कालावधीत उलटल्यानंतरही संतोषने पैसे परत दिले नाहीत.तसेच त्याचा फोन बंद लागत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साळवी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.