Tuesday, May 12, 2026
spot_img
Home गुन्हेगारी गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण

गाडीच्या आरशाला हात लागल्याच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण

चिपळूण:- गाडीचा आरसा हाताला लागल्याच्या शुल्लक कारणावरून एका तरुणाने बाप-लेकाला शिवीगाळ करत धातूच्या कड्याने आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ येथे घडली आहे. या मारहाणीत दोघेही जखमी झाले असून चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र तुकाराम बामणे (वय ४६, रा. रेहेळ) हे शनिवार, ९ मे २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आपल्या घराबाहेरून खडपोली येथे कामावर जाण्यासाठी निघाले होते. रस्त्याने जात असताना त्यांच्या गाडीचा आरसा आरोपी रुपेश पांडुरंग शेलार (रा. रेहेळे) याच्या हाताला लागला. यावरून संतापलेल्या आरोपीने महेंद्र बामणे यांना जोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​शिवीगाळीचा आवाज ऐकून महेंद्र यांचा मुलगा अभिषेक बामणे (वय २२) हा घटनास्थळी धावून आला. त्याने आरोपीला नेमके काय झाले, याबाबत विचारणा केली असता, आरोपीने त्याचे काहीही ऐकून न घेता अभिषेकची कॉलर पकडली आणि त्याच्या डोक्यावर हाताच्या ठोशांनी मारहाण केली.

​आपल्या मुलाला वाचवण्यासाठी महेंद्र बामणे मध्ये पडले असता, आरोपी रुपेश शेलार याने स्वतःच्या हातातील एका धातूच्या कड्याने महेंद्र यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात महेंद्र बामणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच या झटापटीत अभिषेकच्या हातातील चांदीची अंगठी कोठेतरी गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

​या प्रकरणी महेंद्र बामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी आरोपी रुपेश पांडुरंग शेलार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. १० मे रोजी पहाटे २.५३ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.