खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी येथील एका हॉटेलनजीक मोटारीतून १२ किलो गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गांजा विक्री प्रकरणात देखरेखीसाठी रवींद्र दत्ताराम खळे याने वापरलेली दुचाकी येथील चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथून हस्तगत केली. कशेडी घाटातील एका टपरीतूनही गांजाच्या ३ ते ४ पिशव्याही येथील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार, येथील पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिस निरीक्षक भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोटारीतून गांजाची वाहतूक करणाऱ्या रवींद्र सहदेव जाधव (४५, रा. सिद्धार्थनगर घाटकोपर, मुंबई) याला पाठलाग जेरबंद केले होते. त्याच्याकडून २७ हजार रुपये किंमतीचा गांजा, ५ लाखांची मोटार व अन्य साहित्य असा ५ लाख ४४ हजार २१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या गांजा प्रकरणात चिपळूण तालुक्यातील वालोपे वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या रवींद्र खळे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यालाही येथील पोलिसांनी गजाआड केले. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली आहे.