रत्नागिरी:- शहरातील गवळीवाडा येथे तरूणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 50 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. वेदांग चंद्रकांत आखाडे (18, रा गवळीवाडा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर विल्सन सॅम्युअल वाघचौरे (35, ऱा. बोर्डींग रोड, रत्नागिरी) याचा खून केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला शहर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
खून प्रकरणात अटक झाल्यानंतर वेदांग याच्याकडून जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबालकर यांनी जामीन अर्जावर निर्णय दिला. गुन्ह्यातील माहितीनुसार, वेदांग आखाडे व विल्सन वाघचौरे यांची 19 एप्रिल 2023 रोजी पहाटे 4 च्या सुमारास साई चौक गवळीवाडा येथे भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये काही काळ बाचाबाची झाली. यावेळी विल्सनने शिवी दिली. या रागातून वेदांग याने विल्सन याच्या डोक्यात दगड घातला. तसेच विल्सन याला जखमी अवस्थेत टाकून वेदांगने घटनास्थळावरून पळ काढला, असा आरोप वेदांगवर ठेवण्यात आला. जखमी अवस्थेत आढळलेल्या विल्सन याला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान विल्सन याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विल्सन याची बहीण प्लेव वाघचौरे हिने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला तसेच पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान आपल्याला जामीन मिळावा, यासाठी वेदांगकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.