खेड:- कोकण रेल्वेच्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधील ३ लाख २० हजार रुपयांचे दागिने चोरट्याने पळविले. खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. १६) दुपारच्या सुमारास खेड रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपदा संदीप सकपाळ (४४, रा. आंबये – सकपाळवाडी, सध्या आंबये) या आपल्या मूळ गावी आल्या होत्या. गणरायाला निरोप दिल्यानंतर बोरिवली येथे रेल्वे गाडीतून जाण्यासाठी त्या खेड रेल्वे स्थानकात कुटुंबीयांसह आल्या होत्या. सावंतवाडी-दिवा गाडीतील बोगी नं. २२ रेल्वे डब्यात चढल्या. गाडीला गर्दी असल्यामुळे त्या डब्यात खालीच बसल्या होत्या. वीर रेल्वेस्थानक दरम्यान त्यांनी मोबाईल घेण्यासाठी पर्स उघडली असता दागिने लांबवल्याचे निदर्शनास आले. त्यांना धक्का बसला. पर्समध्ये १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २ सोनसाखळ्या, सोन्याचा हार, कानातील झुमके, कानातील २ सोन्याच्या पट्ट्या, २ सोन्याच्या अंगठ्या व कंबरलेला लावायचा चांदीचा छल्ला असा ३ लाख २० हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.