रत्नागिरी:-मॉन्सूनची वर्दी मिळाल्याने समुद्रातील अंतर्गत प्रवाह बदलत असून त्याचा परिणाम गणपतीपुळे किनारपट्टीवर दिसून येत आहे. गणपती मंदिरासमोर निर्माण होणार्या धोकादायक खड्ड्यांची जागा (चाळ) बदलून ती पुढे पोलिस चौकीच्या मागील बाजूस सरकली आहे. याच ठिकाणी मागील पंधरा दिवसात पर्यटक बुडण्याच्या चार घटना घडल्या. त्या पर्यटकांना मोरया वॉटर स्पोर्टस्च्या स्पीडबोटींसह जीवरक्षकांनी वाचवले.
बंगालच्या उपसागरात आठ दिवसांपुर्वी निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळानंतर समुद्र खवळला आहे. हवामान विभागानेही यंदा मॉन्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला असून तसे बदल निसर्गामध्ये जाणवत आहेत. मॉन्सूनची वर्दी मिळाली की समुद्रातील अंतर्गत प्रवाह बदलतात. तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली असून समुद्र खवळलेला आहे. गणपतीपुळे किनार्याची रचना ही दोन डोंगरांच्या मधोमध आहे. दोन्ही बाजूने येणार्या प्रवाहांमुळे या किनार्यावर आहोटीच्यावेळी चाळ (खड्डे) तयार होतो. त्यात पोहणारा पर्यटक सापडला की तो लाटांच्या वेगाबरोबर खोल समुद्रात वाहून जातो. खड्ड्यांच्या ठिकाणी वाळू वेगाने समुद्राच्या दिशेने सरकत जाते. वाळूत पाय रोवून न राहील्यामुळे पर्यटक गटांगळ्यात खाऊ लागतो. पुर्वी गणपतीपुळे मंदिरासमोर अशी चाळ निर्माण होऊन पर्यटक बुडाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये चाळीसहून अधिक पर्यटक बुडून मृत पावल्याची नोंद आहे. समुद्रातील अंतर्गत प्रवाहांमुळे खड्डे तयार होण्याची जागा सतत बदलत राहते. याला स्थानिक ग्रामस्थांसह तज्ज्ञ अभ्यासकांनीही दुजोरा दिला आहे. सध्या मॉन्सूनचे संकेत मिळू लागल्यामुळे समुद्राच्या पाण्याला प्रचंड ताण आहे. गणपतीपुळेतील खड्ड्यांची जागा बदलली आहे. प्रवाह बदलामुळे अशी स्थिती निर्माण झाली आहे. हलके वारेही वाहत आहे. यामुळेच गेल्या पंधरा दिवसात गणपतीपुळे किनार्यावर पोलिस चौकीच्या मागील बाजूस चार वेळा पर्यटक बुडण्याचे प्रकार घडले. दरम्यान, सोमवारीही (ता. 16) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कराड येथून आलेले चार पर्यटकांना मोरया वॉटर स्पोर्टस्च्या स्पीड बोटींनी वाचवले. त्यांना किनार्यावरील जीवरक्षकांनीही मदत केली होती. लाटांच्या वेगामुळे ते पर्यटक खोल समुद्राकडे वाहून जाऊ लागले. चारही प्रकार ओहोटीच्यावेळी घडल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. पर्यटकांनीही सुरक्षितता बाळगावी असे आवहन पोलिस प्रशासनासह ग्रामपंचायतीने केले आहे.