Thursday, September 17, 2026
spot_img
Home संगमेश्वर गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्क्याने तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरात गणपती सजावटीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुहास विष्णू केळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मुरडव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास सुहास केळकर हे आपल्या घरात गणपती सजावटीचे काम करत होते. सजावटीसाठी विद्युत रोषणाईचे तोरण लावत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने ते खाली कोसळले.

घटनेनंतर त्यांचे भाऊ स्वप्निल विष्णू केळकर यांनी तातडीने सुहास यांना वाहनातून आरवली येथील डॉ. भायजे यांच्याकडे उपचारासाठी नेले. प्राथमिक तपासणीनंतर अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सुहास केळकर यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, आमृ क्रमांक ३८/२०२६ अशी नोंद आहे. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने मुरडव-सुतारवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.