Sunday, September 20, 2026
spot_img
Home संगमेश्वर गणपती विसर्जनावेळी सोनवी नदीत बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

गणपती विसर्जनावेळी सोनवी नदीत बुडून २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

संगमेश्वर:- गणपती विसर्जनावेळी माभळे येथे सोनवी नदी पात्रात दोघे जण बुडाल्याची घटना घडली. यामध्ये बुडणाऱ्या वडिलांना वाचविण्यात यश आले, मात्र त्यांचा मुलगा पाण्यात बुडाला. त्या दोघांना वाचवण्यासाठी आजोबांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना नातवाला वाचवता आले नाही. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

या घटनेत पुरुषोत्तम गुणाजी घडशी यांना वाचविण्यात यश आले असून, बुडालेल्या मुलाचे नाव प्रज्ज्वल पुरुषोत्तम घडशी (वय २२) असे आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम घडशी हे मुलगा प्रज्वल याच्यासह कुटुंबीयांसोबत गणपती विसर्जनासाठी संगमेश्वर पोलिस ठाण्यासमोरील सोनवी नदीच्या काठावर गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते दोघे इतर ग्रामस्थांबरोबर पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले. मुलगा आणि नातू नदीत बुडाल्याचे लक्षात येताच गुणाजी घडशी यांनी त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. त्यांच्याबरोबर इतर ग्रामस्थही धावले. प्रज्ज्वलने गुणाजी यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. दरम्यान, यावेळी जवळच असलेल्या श्रीकांत घडशी यांनी नदीत

उडी घेत बुडत असलेल्या पुरुषोत्तम घडशी यांना बाहेर काढले. यानंतर प्रज्वलचा शोध सुरू करण्यात आला. सुमारे २० मिनिटांनी काही युवकांनी प्रज्वलला पाण्यातून बाहेर काढल; मात्र बराच वेळ पाण्यात बुडून राहिल्यामुळे त्याला वाचविण्यात यश आले नाही.

खोल खड्यांमुळे अंदाज आला नाही

नदीपात्रातील खोल खड्ड्यांबाबत ग्रामस्थांसह गुणाजी घडशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी महामार्ग चौपदरीकरणासाठी गाळ उपसा करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत. पूर्वी सपाट असलेल्या भागात आता खड्ड्यांमुळे पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज येत नसल्याचे त्यांनी सांगितले.