जेटस्की बोटीच्या मदतने दोघांना वाचवण्यात यश
रत्नागिरी:- ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथून गणपतीपुळे येथे देवर्शन व पर्यटनासाठी आलेल्यांपैकी तिघेजण सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बुडाले.
मदतीसाठी आरडाओरड झाल्यानंतर यातील दोघांना जेटस्की बोटीच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून अमोल गोविंद ठाकरे (25) युवकाचा मात्र मृत्यू ओढवला आहे. किनाऱ्यावरील जीवरक्षक तसेच मंदिर प्रशासनाकडून वारंवार सूचना देवूनही पर्यटक समुद्रस्नान करताना खबरदारी घेत असल्याचे उघड झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काही मित्र शनिवारी गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते सर्वजण मंदिरानजीकच्या समुद्रात उतरले असताना यातील तिघेजण बुडू लागले. या नंतर किनाऱ्यावर आरडाओरड झाल्यावर जीवरक्षकांनी बुडणाऱ्या तिघांपैकी मंदार दीपक पाटील (24, सायन), विकास विजयपाल शर्मा (24, मुलुंड) यांना किनाऱ्यावर सुरक्षित आणले. मात्र, यातील अमोल गोविंद ठाकरे (25) याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोसिल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
.









