गणपतीपुळे-चाफे मार्गावर दुचाकीला कारची धडक

दोन जखमी, कार चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर रामरोड येथील एसटी पिकअप शेडजवळ झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना ३० एप्रिल रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी कार चालक अभिजीत श्रीरंग शेवडे (वय ३६, रा. निवेंडी भगवतीनगर, ता. जि. रत्नागिरी) याच्या विरोधात जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजीत शेवडे हा त्याच्या टाटा कंपनीच्या इंडिका कार (एम.एच. ०८/ए.पी/६९३१) मधून चाफेहून गणपतीपुळ्याकडे जात होता. रामरोड एसटी पिकअप शेडजवळील वळणावर त्याने बेदरकारपणे गाडी चालवली. त्यामुळे समोरून येणाऱ्या स्प्लेंडर दुचाकी (एम.एच.०९/पी.डब्ल्यु/१८७२) ला त्याची धडक बसली.

या अपघातात दुचाकीस्वार अबु शाम मनिक (वय २४, रा. निवेंडी दवळ किंद्रापूर) आणि उमेश जगदीश सिंग (वय ३८, रा. निवेंडी जवळ) हे जखमी झाले. त्यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून, त्यांच्या दुचाकीचे आणि आरोपीच्या कारचेही नुकसान झाले आहे.

या घटनेची तक्रार पोलीस हवालदार निलेश सुरेश भागवत ( ४२, जयगड सागरी पोलीस ठाणे) यांनी ०३ मे रोजी रात्री ११ वाजून ३६ मिनिटांनी जयगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी कार चालक अभिजीत शेवडे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.