गणपतीपुळे किनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विशेष योजना

रत्नागिरी:- प्रसिध्द पर्यटनस्थळ गणपतीपुळेत पर्यटकांचा बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. हे लक्षात घेऊन किनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी भरती-ओहोटीच्या वेळा दर्शवणारे फलक लावण्यात आले असून दिवसभर स्पीकरवरुन सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवरक्षक, सागरी रक्षकांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.

दिवाळीच्या सुट्टीत मोठ्याप्रमाणात पर्यटक दाखल होणार आहेत. गणपतीपुळेतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थानांसह हॉटेलमध्ये पुढील आठवडाभर पर्यटकांची रेलचेल राहील. या कालावधीत गणपतीपुळे किनारी पर्यटकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या वारे वाहत असल्यामुळे समुद्र खवळलेला असून पाण्याचा प्रचंड करंट आहे. या परिस्थितीत भरती-ओहोटीच्या कालावधीत गणपतीपुळे किनारी पर्यटक समुद्रस्नानासाठी गेल्यास बुडण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने दोन दिवसांपुर्वी ग्रामपंचायत आणि देवस्थान प्रशासन यांच्याशी चर्चा केली. यावेळी अपर पोलिस अधिक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत जयगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदिश कळेकर यांनी उपाययोजनांविषयी मार्गदर्शनही केले.

किनार्‍यावरील पर्यटकांना भरती-ओहोटीचे वेळापत्रक समजावे यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्या-त्यावेळी पर्यटकांना स्पीकरद्वारे सुचना देऊन समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच अनुचित प्रकार घडल्यास वाचवण्यासाठी ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षक, सागर रक्षक आणि पोलिस मित्र मिळून चाळीस जणांचे पथक किनार्‍यावर लक्ष ठेवणार आहे. दोघांना वेगवेगळी टिशर्ट देण्यात आली आहेत. पर्यटकांना हे रक्षक सुचना देत आहेत. महिन्याभरापुर्वी गणपतीपुळे किनारी एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर सतर्क झालेल्या पोलिस प्रशासनाने हे प्रकार टाळण्यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान सतर्क झाले आहे.