चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे वनविभागाच्या पथकाने ट्रकमधून केली जाणारी खैरतस्करी उघड केल्यानंतर नेमके कनेक्शन शोधण्यातच पोलादपूर वनविभागाचे पथक गुंतले आहे. पोलादपूरहून चिपळूणला नेमका कोणाला खैरांच्या सोलीव तुकड्यांचा पुरवठा केला जात होता, याचाही पथकाकडून शोध घेतला जात आहे. या खैरतस्करीप्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचाही पडताळा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्रकचालक सिद्दीक अब्दुल रहेमान वाढेल (रा. गोध्रा- गुजरात) हा ट्रकमधून ४३० खैराचे सोलीव तुकडे घेवून पोलादपूर येथून चिपळूणच्या दिशेने जात असताना पोलादपूर वनविभागाने रचलेल्या सापळ्यांत रंगेहाथ पकडले होते. खैराचे सोलीव तुकडे व ट्रकसह ७ लाख रूपये किंमतीचा ऐवज वनविभागाच्या पथकाने हस्तगत करत ट्रकचालकासह अन्य एका व्यक्तीस ताब्यात घेतले. या दोघांची वनविभागाच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
खैराचे सोलीव लाकडाचे तुकडे नेमकी आणले कुठून, या सोलीव तुकड्यांचा नेमका कोणाला पुरवठा होणार होता, या खैरतस्करी प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का या आणि अशा प्रश्नांचा उलगडा करण्यात पोलादपूर वनविभागाचे पथक गुंतल्याची माहिती समोर आली आहे. पोलादपूर वनविभागाच्या धडक कारवाईने अनधिकृतपणे खैरांची तस्करी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.









