चिपळूण:- खेर्डीतील एका कंपनीने शेकडो युवकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. सद्यस्थितीत २२ लोकांची तब्बल २४ लाखांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून आणखी एका भुलभुलैय्या कंपनीविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ईडू, अर्न इंडिया, बिटकॉईन, कल्पवृक्ष, ट्विंकल, शाईन इंडिया आदी कंपन्यांनी चिपळूणवासीयांना करोडो रुपयांचा चुना लावला आहे. त्यात आणखी भर पडली असून अनेक तरुण-तरुणी यामध्ये फसल्या आहेत. खेर्डी माळेवाडी येथील स्वामी समर्थ कृपा असोसिएशन कंपनीमध्ये पैसे गुंतवून अनेक मुलांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी गोंधळे देऊळवाडी येथील कैलास सिताराम मालुसरे (४०) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेर्डी माळेवाडी येथील संजय रामभाऊ चव्हाण यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी संजय चव्हाण यांनी श्री स्वामी समर्थ कृपा असोसिएशन कंपनी स्थापन करून १८ ते ४० वयोगटातील लोकांना जॉब देतो, असे आमिष दाखविले. नोकरीसाठी आकर्षित होणार्या एका युवकाला आणखी पाचजण जोडून देणे बंधनकारक होते. त्यानंतर त्या बदल्यात पाच ते पंचवीस हजार रुपये परतावा मिळेल, असे आमिष कंपनीने दाखविले. याच कंपनीने डिसेंबर २०२० मध्ये नवी योजना जाहीर केली. ५०० रुपयांना कंपनीचा आय.डी. घेतल्यास १६० रुपये परतावा मिळेल, अशी योजना जाहीर झाली. या आमिषाला बळी पडून कैलास मालुसरे यांनी १ लाख ८१ हजार ५०० रुपये या योजनेत गुंतवून ३६३ आय.डी. खरेदी केले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
अशा पध्दतीने शहर व तालुक्यातील तब्बल 22 लोकांची २३ लाख ७३ हजार ८० रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.