खेड रेल्वे स्थानकावर आयपॅडसह चांदीच्या चेनची चोरी

खेड:- खेड रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातून एका प्रवाशाच्या बॅगेतून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा सुमारे १५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ जुलै रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी घडली असून, याप्रकरणी सायंकाळी १७ वाजून १० मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्व संतोष खुरसडे (वय २१, रा. भुसावळ, जि. जळगाव, सध्या सिल्वासा) हे खेड रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात थांबले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून हा ऐवज लंपास केला. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये ॲपल कंपनीचा आयपॅड आणि एक चांदीची चेन यांचा समावेश आहे.

याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. रेल्वे स्थानकावर झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.