८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत
खेड:- खेड येथील खेडजाई मंदिराजवळ असलेल्या शशिकांत राजाराम दांडेकर यांच्या शेतात एका ३२ वर्षीय तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाळू विठ्ठल वाले (वय ३२, सध्या रा. खेड कुंभारवाडा, मूळ रा. लक्ष्मीनगर, कुपवाडा रोड, सांगली) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाळू वाले हा खेड येथील एका सेक्युरिटी ऑफिसमध्ये कामाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो कामावर येत नसल्याने ऑफिसमधून त्याच्या घरी फोन करण्यात आला. कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोनही बंद येत होता. बाळूला पूर्वीपासूनच कोठेतरी निघून जाण्याची सवय असल्याने, त्याचे भाऊ खंडू विठ्ठल वाले यांनी ८ दिवस त्याची वाट पाहिली. अखेर भाऊ घरी न परतल्याने खंडू वाले हे २० मे रोजी खेड पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आले होते.
खंडू वाले पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाच, १९ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास खेडजाई मंदिराजवळ शशिकांत दांडेकर यांच्या शेतात एक पुरुष जातीचा मृतदेह उपड्या अवस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच खंडू वाले यांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.
शेतजमिनीत आढळलेला मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र, मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि डोक्याच्या टाळूवरील टकलावरून खंडू वाले यांनी तो मृतदेह त्यांचा बेपत्ता असलेला भाऊ बाळू विठ्ठल वाले याचाच असल्याची खात्री केली.
या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे पाठवला आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू गुन्हा क्रमांक ३८/२०२६ नुसार नोंद केली असून, तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









