खेड:- खेड येथे पोलिसांनी बंदी असलेला गुटखा आणि तंबाखू जप्त केला आहे. कंटेनर मधून या गुटखा व तंबाखूची वाहतूक करण्यात येत होती. कंटेनरसह १८ लाखांचा मुद्देमाल खेड पोलिसांनी जप्त केला आहे. याशिवाय दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खेड पोलीस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोरून, बेकायदेशिर गुटखा वाहतूक होत असल्याची खेड पोलिसांनी प्राप्त झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार खेड पोलीस निरीक्षक व कर्मचारी यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील रेल्वेस्टेशन समोर नाका बंदी केली. या नाकाबंदी दरम्यान रविवारी दुपारी अडीच वाजता एक कंटेनर तपासणीसाठी थांबवण्यात आला. कंटेनर ची झाडाझडती घेतली असता कंटेनरमध्ये विमल पान मसाला व V-1 तंबाखू असा मिळून 8,80,200 रुपये किमतीचा गुटखा व ९ लाख २५ हजारांचा कंटेनर मिळून एकूण 18,05,200 चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या वाहनावरील चालक प्रेमल शंकर मोकळ (वय-35 वर्षे, रा. वाशीनाका, घर क्रं. 104, पेण, जि. रायगड) व जगदिश हरीश्चंद्र म्हात्रे (वय-33 वर्षे, रा. कांदळेपाडा, पेण, जि. रायगड) या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरचा “प्रतिबंधीत गुटखा” हा, वरील नमूद आरोपी हे विक्री करिता घेऊन जात असताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि नंबर ३४०/२०२३ भा. द. वि. संहिता कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ व अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे कलम २६(१), २६(२) २६(२), २६(२), २६(३), २७ (३९), ३०(२ ३) अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
तसेच सदरची कारवाई, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी खेड पोलीस ठाणे श्री. नितीन भोयर व अंमलदार यांनी केली आहे.









