खेड तालुक्यातील तिसे सकपाळवाडीत लाखोच्या घरफोडी प्रकरणी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा

खेड:- खेड तालुक्यातील तिसे सकपाळवाडी येथे बंद घराच्या दर्शनी दरवाजाचा कोयंडा एखाद्या धारदार हत्याराने उचकवून दरवाजा उघडून बेडरूममध्ये प्रवेश करत कपाटाचे लाॅकर उघडून लाॅकर आतमधील 1 लाख 12 हजारांचे दागिने अज्ञाताने चोरून नेले.  

चोरट्याने 15 हजार रू. किमतीचा सोन्याचा हार, 40 हजार रू. किमतीचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, 40 हजार रू. सोन्याची चैन, 20 हजाराची सोन्याची अंगठी, 2 हजार रू. सोन्याची नथ, पिशवी मधील 13 हजार 800 रोकड रक्कम असा एकुण 1 लाख 12 हजार 800 रू. चा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी दिपाली दिनेश सकपाळ (वय 41 रा. तिसे सकपाळवाडी, ता खेड जि. रत्नागिरी) यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

सध्या चोरट्यांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळविला आहे. शहरात सीसीटिव्हीच्या तिस-या डोळ्याच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्याचे काम पोलीस करीत असल्याने शहरात चो-या करून पोलीसांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा चोरट्यांनी आपला मोर्चा आता गावाकडे वळवला आहे. मात्र अशा घरफोडी प्रकरणाने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या घरफोडीच्या तपासाचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे आहे. घरफोडी करणारे माहीतगार असावेत, असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. घरमालक घरात राहत नाहीत याची माहिती अज्ञाताने घेऊन घरफोडीचे काम चोरट्याने फत्ते केले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घरफोडीचा अधिक तपास पोलीस करीत आहे.