संशयितांची संख्या 6 वर पोहोचली
खेड:- खारी-देवणं पुलानजीक झालेल्या गोहत्या प्रकरणाचा छडा लावून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास गतीमान केला आहे. गोहत्याप्रकरणी येथील पोलिसांनी आणखी एकास बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून गोमांसही जप्त केले आहे. या प्रकरणात सहभाग असलेले काही संशयित पसार झाले असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. यापूर्वीच्या गोहत्या प्रकरणातील गुन्हेगारींची येथील पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार असल्याचे समजते.
देवणं पुलानजीक सलग दोन दिवस गोवंशसदृश जनावरांचे अवशेष आढळल्यानंतर वातावरण तणावपूर्ण बनले होते. येथील पोलिसांनी अवघ्या 24 तासातच 4 संशयितांच्या मुसक्या आवळताच तणावपूर्ण वातावरण निवळले होते. मात्र तरीदेखील हिंदुत्ववादी संघटनांनी गोहत्याच्या निषेधार्थ बंदी हाक दिल्यानंतर व्यापाऱ्यानी उत्स्फूर्त बंद पाळला होता.
हिंदुत्ववादी संघटनांसह विविध राजकीय पक्षांनी देखील संयम पाळत पोलिसांना तपासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे स्पष्ट केले होते.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तपासाला गती देत चौघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या चौघांचीही पोलीस कोठडी शुक्रवारी संपणार आहे.
खाडीपट्टयातून एका संशयिताला गजाआड केलेले असताना गावारीही आणखी एकास पोलिसांनी जेरबंद केले. गोहत्या प्रकरणातील संशयितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. गोहत्या प्रकरणात रॅकेट असण्याच्या शक्यतेने येथील स्थानिक पोलिसांसह गुन्हा अन्वेषणचे पथकही वेगवेगळ्या शक्यतांचा पडताळा करत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पोलिसांनी कंबर कसली आहे. यापूर्वी घडलेल्या गोहत्या प्रकरणातील गुन्हेगारींची कसून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात सहभाग असलेले काहीजण भूमिगत झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.









