रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी मार्गावरील खेडशी येथे सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका भरधाव येणाऱ्या डंपरने समोरील दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डंपरच्या चाकाखाली चिरडून जाकादेवी येथील पांचाळ कुटुंबातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेला डंपर महामार्गावरून थेट खाली कोसळला आणि याच डंपरखाली दाबले गेल्याने महिलेला आपले प्राण गमवावे लागले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत असताना, खेडशी परिसरामध्ये पाठीमागून येणाऱ्या एका अनियंत्रित आणि वेगवान डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरच्या थेट खाली आली. दुचाकीला उडवल्यानंतर डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले त्यामुळे , डंपर रस्त्याच्या खाली कोसळत असताना ती महिलाही डंपरच्या खालीच दबली गेली, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
विशेष आणि धक्कादायक बाब म्हणजे, आज सकाळी ज्या ठिकाणी हा डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, त्याच ठिकाणी काही वेळापूर्वीच एका रिक्षाचाही अपघात झाला होता. त्यामुळे हा परिसर आज अपघाताचे केंद्र बनला होता.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, डंपर महामार्गावरून खाली कोसळल्याने आणि मोठी गर्दी जमल्याने हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, या घटनेमुळे संपूर्ण जाकादेवी आणि खेडशी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.









