रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीक चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री तब्बल पाच बंद घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. खेडशी येथे चार घरे, तर फणसवळे येथे एका घराचा समावेश आहे. या धाडसी चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवार, २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई यांच्यासह त्यांच्या शेजारील आणखी तीन घरे चोरट्यांनी लक्ष्य केली. देसाई कुटुंब सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचे घर उघडलेले पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांना आजूबाजूची इतर तीन घरेही फोडलेली आढळली.
दरम्यान, खेडशीजवळच असलेल्या फणसवळे येथे भिकाजी माने यांचे बंद घरही अज्ञात चोरट्यांनी फोडले. माने कुटुंब मुंबई येथे वास्तव्यास असून, त्यांचे घर बंद होते. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना सूचित केले.
ग्रामीण पोलिसांनी खेडशी आणि फणसवळे येथील घटनास्थळांचा तातडीने पंचनामा केला असून, सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी गेलेल्या मालमत्तेचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.
दरम्यान, घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काही दिवसांपूर्वीच ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करत दोन महिलांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस या घटनांचा कसून तपास करत असून, चोरट्यांना लवकरच पकडतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.