खेडशीत जामीनदाराकडून कर्जदाराला मारहाण, वृद्ध महिलेसह तिघे जखमी

रत्नागिरी:- “सध्या कोरोना असल्याने कर्ज फेडण्याचे राहून गेलेले आहे, ते आम्ही लवकरात लवकर फेडतो” असे सांगितल्याचा राग आल्याने जामीनदारानेच कर्जदाराला शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. ही घटना २ ऑगस्ट रोजी महालक्ष्मीनगर, खेडशी येथे घडली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीम. वृषाली अशोक गणफुले (वय ६० रा. महालक्ष्मीनगर, खेडशी) यांचा मुलगा शैलेंद्र याने व्यवसायाकरिता शिवकृपा पतसंस्था, रत्नागिरी मधुन दीड लाखाचे कर्ज घेतले होते. यातील फक्त २४ हजाराचे कर्ज फेडणे बाकी होते. हे कर्ज घेतेवेळी केतन चंद्रकांत शिर्के याला जमीन ठेवण्यात आले होते. दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी केतन चंद्रकांत शिर्के व संतोष चंद्रकांत शिर्के यांनी फिर्यादी यांच्या मुलाला घराच्या बाहेर बोलावत कर्ज कधी फेडणार असे विचारले. मात्र याबाबत कारण देताच केतन चंद्रकांत शिर्के व संतोष चंद्रकांत शिर्के यांनी शिवीगाळ करून काठीने मारहाण करीत तुम्हा सर्वांना बघून घेतो अशी धमकी दिली अशी तक्रार श्रीम. वृषाली अशोक गणफुले यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली आहे. या केलेल्या मारहाणीत श्रीम. वृषाली अशोक गणफुले (वय ६०), शालेंद्र गणफुले (वय ३१), सौ. श्रावणी शैलेंद्र गणफुले (वय २८) हे तिघेजण जखमी झाले आहेत.