मुद्देमालासह एकजण ताब्यात
खेड:- तालुक्यातील भोस्ते येथील एका घरातून 1 लाख 90 हजार रुपये किंमतीचे दागिने व 10 ते 15 हजार रुपयांची रोकड असा 2 लाख रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरटयाने लंपास केला होता. याबाबत पोलीस स्थानकात रितसर तक्रार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी काही तासातच घरफोडीचा छडा लावत एकास ताब्यात घेतले.
भोस्ते येथील एका राहत्या घरातून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व 10 ते 15 हजाराची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास येतात तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका संशयितास ताब्यात घेतले. या संशयिताची कसून चौकशी करण्यात आली असता घरफोडी कबुली दिली.
संशयिताकडून चोरलेले दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सोडलेल्या रक्कमेचे संशयिताने नेमके काय केले, याचा तपास मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. या चोरटयाने यापूर्वीही घरफोडया केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे.