खेड:- संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकनाथ पांडुरंग पाटणे (36, शिवाजीचौक, खेड), भरत नारायण कदम (50, विहाली नांदिवली, खेड), फैरोज हुसेन जोगीलकर (40, धारवली, पोलादपूर, रायगड) अशी तिघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड पोलीस स्थानकातील महिला पोलीस कॉन्टेबल तेजस्विनी जाधव, आणि ढेंगरे या 15 नोव्हेंबर रोजी शहरात पेट्रोलिंग करत होत्या. एसटी स्टॅण्ड, डाकबंगला, तिनबत्तीनाका, शिवाजी चौक परिसरात पेट्रोलिंग करताना रात्री 1 वाजण्याच्या दरम्याने एका बिल्डींगच्या आडोशाला तिघेजण संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी थातुरमातुर उत्तरे दिली. त्यांची झाडाझडती घेतली असता फैरोज जोगीलकर याच्या हातात लोखंडी सळी दिसून आली. चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही पोलीस स्थानकात आणले. त्यांची चौकशी सुरु आहे.









