खेडमध्ये भंगारच्या गोदामात चोरी; दोन आरोपींना अटक

खेड:- खेडमधील भंगारच्या गोदामातून हजारो रूपयांचे ड्रम सिट चोरणाऱ्या दोघा संशयित आरोपींना खेड पोलीसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुद्देमालासह पकडले.

पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, धामणदेवी येथील ओमेगाईन हॉटेलजवळील एका भंगार गोडावूनमधून तब्बल ६४ हजार रुपये किमतीचे एम.एस. पत्राचे ६४ ड्रम सिट चोरीला गेले होते. ही चोरीची घटना २९/०९/२०२५ रोजी सायंकाळी ०६ वाजल्यापासून ते ३०/०९/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजण्याच्या मुदतीत घडली. मिरजोळी येथील भंगार विक्रेता सादिक सलीम कुरेशी (वय-२९) यांच्या मालकीच्या गोडावूनमधून हा ऐवज लंपास करण्यात आला होता. चोरी उघडकीस येताच, फिर्यादी सादिक कुरेशी यांनी, तत्काळ खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान, पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आरोपी मंदार श्याम हुमणे (रा. परशुराम, दुर्गेवाडी, ता. चिपळूण) आणि संकेत महाडिक (रा. पाली, ता. खेड) या दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने चोरी केल्याचे तपासात पुढे आले. आरोपी हे चोरीचा माल अॅपे रिक्षा टेम्पोतून चोरून नेत असताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत त्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण ६४,०००/-रुपये किमतीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे भंगार व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.