खेडमध्ये बँक कर्मचारी तरुणीची आत्महत्या

खेड:- शहरातील बस स्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय तरुणीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सुप्रिया विनायक वनाशा (वय ३२, रा. भाईंदर, ठाणे, सध्या रा. रुम नं ३०२, तिसरा मजला, ग. म. पाटणे संकुल, कुंभार आळी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ४.१५ वाजण्यापूर्वी सुप्रिया वनाशा यांनी आपल्या राहत्या फ्लॅटमधील किचनमध्ये छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात सायंकाळी ८.३२ वाजता करण्यात आली आहे. सुप्रिया वनाशा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणीच्या आत्महत्येमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये आणि खेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.