खेड:- शहरासह ग्रामीण भागात थैमान घालणारी डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी तालुका आरोग्य विभागास नगर प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असले तरी दिवसेंदिवस डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा वाढतच आहे. शहरासह खोंडे, भरणे येथील ६ नव्या डेंग्यूसदृश रुग्णांची भर पडल्याने ही संख्या ६६ वर पोहचली आहे.
साथ रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करत तेथे औषधांचे द्रावण तयार करून टाकण्यावर भर देण्यात येत आहे. तीनबत्तीनाका परिसरासह पावसकर नाका, समर्थनगर परिसरात डेंग्यूसदृश सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. साथग्रस्त भागात नगर प्रशासनाने जंतूनाशक फवारणी करूनही डेंग्यू साथीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुका आरोग्य विभागाने डोअर टू डोअर सर्वेक्षणासह कंटेनर सर्वे अधिक गतिमान केला आहे. शहरापाठोपाठ तालुक्यातील १३ गावांमध्येही डेंग्यू साथीने डोके वर काढले आहे. या साथग्रस्त गावांमध्येही तालुका आरोग्य विभागाकडून डोअर टू डोअर सर्वेक्षणासह नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.









