खेडमधील चार गावांच्या मंदिरातील दानपेट्या फोडल्या; चोरटे सीसीटीव्हीत कैद

खेड:- तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच चोरट्यांनी ग्रामदेवतांच्या मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारण्यास सुरूवात केल्याने गणेशोत्सवाच्या आनंदाला गालबोट लागले आहे. रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांच्या नाकारवर टिच्चून चोरट्यांनी एकाच रात्रीत कोरेगाव, चिंचघर, धामणी आणि तिसे येथील मंदिरातील दानपेट्या फोडून दानपेटीतील रक्कम लांबवली. चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे बंदिस्त झाले आहेत.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहावयास मिळत आहे. या उत्सवानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. काही गावांमध्ये भजन, कीर्तन तर काही ठिकाणी जाखडी नृत्याचे सामने रंगत आहेत. ग्रामस्थ गणेशोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रम पाहण्यात दंग असल्याचा फायदा उचलत चोरट्यांनी दानपेट्या फोडल्या. दोन दिवसापूर्वी एकाच रात्रीत चोरट्यांनी कोरेगाव येथील धावजी बाबा मंदिर, चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर, तिसे येथील काळकाई मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारला आहे.

सकाळी ही बाब पुजार्‍याच्या निदर्शनास आल्यावर पुजार्‍यांनी ग्रामस्थांना खबर दिली. गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात सुरू असतानाच चोरट्यांनी ग्रामदेवतांच्या दानपेट्या फोडल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. चिंचघर येथील भैरवनाथ मंदिर आणि धामणी येथील झोलाई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे बंदिस्त झाले आहेत. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागलेले नाहीत.