रत्नागिरी:- तांडेल याचा खून करून मच्छीमारी बोट जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयप्रकाश विश्वकर्मा याला दोन दिवसाची पोलीस कोठडी देवगड न्यायालयाने दिली आहे. आरोपींच्या वतीने एडवोकेट आशिष लोके यांनी कामकाज पाहिले.
आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. पोलीस तपासातून या बोटीवर नेमका घटनाक्रम काय घडला हे आता पूर्णतः उघड झाले आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा यांनी आपण तांडेल चे मुंडके किरकोळवादातून तोडले अशी कबुली दिल्याचे देवगड पोलिसांनी सांगितले. अर्थात गुन्ह्याची कबुली देवगड पोलिसांकडे आरोपीने दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या प्रकरणातील आरोपी जयप्रकाश धनवीर विश्वकर्मा (वय 27 वर्षे), राहणार तपकरा, बाधरकोना, जशपूरनगर, वॉर्ड नं. 02, छत्तीसगड येथे, नुजत राबिया नावाच्या मच्छिमारी बोट क्रमांक IND-MH-04-MM-5140 वर जेवण बनवणारा म्हणून काम करत होता. दिलदार युसुफ शेख (वय 39 वर्षे), राहणार बरगी, कुमटा, कर्नाटक, हे पागी (जाळे टाकणारे) म्हणून आणि रविंद्र काशिराम नाटेकर (वय 55 वर्षे), राहणार साखरी, गुहागर, रत्नागिरी, हे बोटीचे तांडेल (बोट प्रमुख) म्हणून कार्यरत होते.
28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1 वाजता मासेमारीसाठी जाळे पाण्यात टाकल्यानंतर बोटीवरील खलाश्यांपैकी प्रमोद रंगलाल रजाक यांनी ‘जेवणी जयप्रकाश तांडेल रविंद्रला सुरीने मारत आहे’ असे ओरडले. यावरून फिर्यादी दिलदार शेख हे बाहेर आले असता, आरोपी जयप्रकाशने तांडेल रविंद्र नाटेकर यांच्यावर मासे कापण्याच्या सुरीने वार करून त्यांचे डोके धडावेगळे केले आणि ते बोटीच्या समोरील भागात ठेवलेले पाहिले.
फिर्यादी शेख यांनी तत्काळ बोटीवरील वायरलेस सेटच्या मदतीने इतर बोटींना बोलावून घेतले. इतर खलाशी भयभीत होऊन एकेक करून पाण्यात उड्या मारू लागले. त्यानंतर आरोपी जयप्रकाशने डिझेलचा (Diesel) स्टोव्ह वापरून बोट पेटवण्याचा प्रयत्न केला. बोटीवर आग लागल्यानंतर फिर्यादी शेख यांनी देखील समुद्रात उडी मारली, आणि आरोपीने सुद्धा समुद्रात उडी मारली.
मदतीसाठी आलेल्या बोटींवरून आरोपी, खलाशी आणि जळालेली नुजत राबिया बोट देवगड जेटी येथे आणण्यात आली. यावरून फिर्यादी शेख यांनी आरोपी जयप्रकाश विश्वकर्मा विरुद्ध तक्रार नोंदवली.
गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यामुळे आरोपीला 29 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:53 वाजता अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या तपासासाठी 5 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती मात्र देवगड न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
पोलीस कोठडी रिमांडची कारणे पोलिसांनी पुढील प्रमाणे दिली होती. मयत खलाशाचा खून करण्यामागील उद्देशाचा तपास करावा लागणार आहे.. गुन्ह्यात आरोपीचा अन्य साथीदार असल्यास त्यांचा शोध घ्यावा लागेल.गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपीने कुठे लपवले आहे, याचा शोध घ्या. गुन्हा करताना आरोपीने घातलेले कपडे जप्त करणे आवश्यक आहे. जळालेल्या बोटीवरील मयताचा मृतदेह नेमक्या ठिकाणी होता, याचा तपास करावा लागेल.आरोपीचा पूर्वइतिहास पडताळण्यासाठी अधिक चौकशी करणे आवश्यक आहे.