आरोपपत्रात स्पष्ट; पोलिस यंत्रणेच्या हाती ठोस पुरावे साापडले
रत्नागिरी:- रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्याबद्दल संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या मनात प्रचंड खुन्नस होती. त्या विचारात असतानाच पेट्रोलपंपासमोर वारिसे अचानक त्याच्यासमोर आला. त्यावेळी खुनशी इराद्यातूनच वारिसे याला थार गाडीने उडवल्याचे विशेष तपासपथकाच्या (एसआयटी) तपासानंतर दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. काही ठोस पुरावेही हाती पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
वारिसे मृत्यू प्रकरणाचा तपास रत्नागिरी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे आहे. पत्रकारांनी हा विषय उचलून धरल्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपासपथकाची नियुक्ती गृहमंत्र्यांनी केली. त्यामुळे चारही बाजूने तपास करण्यात पोलिसांना चांगली संधी मिळाली. ६ फेब्रुवारी २०२३ ला शशिकांत वारिसे यांना राजापुरातील कोदवली पेट्रोलपंपावर महिंद्रा थार गाडीखाली अपघात होऊन वारिसे यांचा मृत्यू झाला. राज्यभरातील विविध पत्रकार संघटना, संस्थांनी या अपघातातील संशयितावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर एसआयटी स्थापन करून तपास सुरू झाला. या तपासानंतर याबाबत संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
६ मे रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, आंबेरकर यांचे एक फोन रेकॉर्डिंग सापडले असून, त्यामध्ये वारिसे याला संपवण्यापर्यंत चर्चा झाल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच यापूर्वी देखील संशय़ित आरोपीने बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल्स रिफायनरीविरोधात लिहिण्याबाबत धमकी दिली होती, असे पोलिससुत्रांनी सांगितले. काही कॉल रेकॉर्डमध्ये आंबेरकरने म्हटले आहे की, एकच काम तमाम करायचे आहे तसेच ऑडिओ रेकॉर्डमध्ये पीडिताला हानी पोहोचवण्याच्या आंबेरकराच्या उद्देशाला पुष्टी मिळते, असे आरोपपत्रात म्हटले आहे. आंबेरकरविरोधात अनेक ठोस पुरावे तपासपथकाच्या हाती लागले आहेत तसेच एक प्रत्यक्षदर्शी पुरावाही असल्याची माहिती पुढे आली आहे.