रत्नागिरी:- तालुक्यातील खानू-मावळंकरवाडी येथे घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा असताना चोरट्याने घरात प्रवेश करुन सोने- चांदीचा ७१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पळविला. ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खानू-मावळंकरवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष महादेव मावळंकर (वय ५०, रा. खानू-मावळंकरवाडी) यांचा मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय आहे. शुक्रवारी त्यांच्या रहात्या घराचा मागील दरवाजा अनावधानाने उघडा राहिला. हि संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरची चावी काढून कपाटातील ६ हजाराचे मंगळसुत्र, २० हजार ३०० रुपयांचे सोन्याचे पेंडल असलेले मंगळसूत्र, २१ हजार ४४५ रुपयांच्या एकूण सात सोन्याच्या अंगठ्या, २३ हजार ६३५ रुपयांच्या कानातील कुडीसह झुमके असा सुमारे ७१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी संतोष मावळंकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.