रत्नागिरी:– तालुक्यातील खानू शिंदेवाडी येथे घर फोडून अज्ञाताने दागिन्यांसह ४ लाख २५ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद संतोष राजाराम चव्हाण (५३, खानू, शिंदेवाडी, रत्नागिरी) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष चव्हाण हे हातखंबा येथील सिध्दगिरी हॉलवर लग्नासाठी गेलेले असताना अज्ञाताने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात लॉकरमध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम लांबवली. यामध्ये १ लाख ५० हजारांची रोख रक्कम, १६ हजार २६६ रुपयांचे तीन सोन्याचे कॉईन, २७ हजार ३५४ रुपयांचे एक सोन्याचे कॉईन, ३३ हजार ३१६ रुपये किंमतीचे एक सोन्याचे मंगळसूत्र, ५५ हजार ७१७ रुपयांची सोन्याची चेन, ४७ हजार ८४ रुपये किंमतीची एक सोन्याची चेन, २८ हजार ५०० रुपयांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ६६ हजार रुपये ८४८ रुपयांचे मंगळसूत्र असा एकूण ४ लाख २५ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चव्हाण यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम ४५४, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.