चिपळूण:- मुंबई/गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत सोमवारी सायंकाळी रिक्षातून खवलेमांजराची होणारया तस्करीचा पर्दापाश केला. याप्रकरणी चिपळूण तालुक्यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. हस्तगत वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 50 लाखाच्या पुढे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोकणातील चिपळूण तालुक्यातून एका रिक्षेमधून वन्यजीवांची तस्करी केली जात असल्याची माहिती रोहे सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव यांना गुप्त माहितगारांकडून प्राप्त झाली. यानुसार वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहन चालक राजेश लोखंडे आदी अधीनिस्त स्टाफसह मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातील भोगाव खुर्द गावातील हद्दीत सापळा रचला. सोमवारी सायंकाळी खवल्या मांजराची मादी एका पिल्लासह पोत्यात भरून खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी रिक्षा ( क्र.एमएच 08 एक्यू 4441 ) मधून वाहतूक करून विक्रीसाठी नेत असताना आढळून आले. या रिक्षामध्ये तीन इसम तस्करी करण्यासाठी एका पोत्यासह दिसून आले. यावेळी छापा घालून तिघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. या तस्करीतील चिपळूण तालुक्यातील कालुस्ते गावांतील रिक्षा चालक मालक आरोपी नरेश प्रकाश कदम, चिवेली येथील सागर श्रीकांत शिर्के तसेच वाघिवरे येथील सिकंदर भाई साबळे या तिघांविरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षणअधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मंगळवारी सायंकाळी या तिघांना न्यायालयात हजर केली असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.









